जिल्हा परिषदेतील पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही पदभरती जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 शासन निर्णयानुसार दि. 31 मेपर्यंत रिक्त जागांबाबत आढावा, जाहिरात, परीक्षा आणि निकाल घोषित करून निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यात याव्यात, असे म्हटले आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रमच जाहीर करण्यात आलेला आहे. साधारण 2 हजार जणांची भरती होणार आहे.

राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे शासन भरणार आहे. ही पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होण्यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी निबंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबत 31 ऑक्टोबर रोजी शासन निर्णयदेखील पारीत करण्यात आला होता. त्यानंतर या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिक्षकांसह गट क मधील 2 हजार पदे रिक्त आहेत. शिक्षकांचीच 1 हजार पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर 170 ग्रामसेवक तसेच इतर 800 पदे रिक्त आहेत. यामुळे आता सर्वांचा पद भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.यावेळी विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर निवड मंडळामार्फत ही भरती होणार आहे.

31 जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा  तपशील, संवर्गानुसार आरक्षण पदभरतीसाठी कंपनी निश्चित करायची आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरतीसाठी जाहिरात  प्रकाशित करण्यात येणार आहे.  8 ते 22 फेब्रुवारीदरम्यान उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अर्जाची छाननी  त्यानंतर 6 ते 13  एप्रिलदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेचा अंतिम निकाल पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश 31 मेपर्यंत देण्यात येणार आहेत.