सलगच्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:- जोडून सुट्ट्या असल्यामुळे शनिवारी (ता. 12) संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी होती. मंदिरामध्ये सायंकाळपर्यंत बारा हजाराहून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवाळी सुट्टी पाठोपाठ संकष्टीही पर्यटन व्यावसायीकांना पावली आहे.

संकष्टीनिमित्त पश्‍चिम महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातील गणेश भक्त गणपतीपुळेत दर्शनासाठी दाखल होतात. शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी आल्यामुळे गणपतीपुळे अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी होती. सकाळी 5 वाजता पुजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सायंकाळी 4.30 वाजता पाखली प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडली. चंद्रोदयानंतर आरती केल्यानंतर सव्वा नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुल होते. सकाळच्या सत्रात दर्शनासाठी रागांच रांगा लागलेल्या होत्या. मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी योग्य पध्दतीने नियोजन केले होते. मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळील उंदरासमोर नतमस्तक होत भक्तगण पुढे सरकत होते. गणपतीचे दर्शन झाल्यानंतर भक्तगण फिरण्यासाठी किनार्‍यावर जात होते. उद्या रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेकांनी एक दिवस गणपतीपुळेमध्येच राहणे पसंत केले होते. त्यामुळे सायंकाळच्या सत्रातही पर्यटकांची गर्दी होती आणि लॉजिंगमध्येही राबता होता. दिवसभरात बारा हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावलेली. संकष्टीला आलेल्या पर्यटकांमुळे येथील व्यावसायिकांचा चांगला फायदा झाला. कोरोनात झालेले नुकसान दिवाळी सुट्टीमध्ये थोडेफार भरुन निघाले होते. पाठोपाठ संकष्टीलाही अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्यामुळे पन्नास लाखाहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.