आता रेशन दुकानात फोन, विजेसह पाणीबिल भरता येणार

वेळ, पैसा वाचणार ; दुकानदारांना नोंदणीचे आवाहन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या रास्त धान्य दुकानांवर गहू, तांदूळ, साखर, डाळी मिळतात त्या रेशन दुकानांवर आता वीज, फोन आणि पाणीबिल भरता येणार आहे. विश्वास बसत नाही ना, परंतु हे खरे आहे. जिल्हा पुरवठा विभागाने इच्छुक दुकानदारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या बिलं भरण्यासाठी होणाऱ्या खेपा वाचणार आहेत. थोड्याच रास्त दुकान दुकानदारांनी यासाठी नोंदणी केली आहे.

सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेबरोबरच फोन, वीज, पाणी बिल भरण्याची सुविधा ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने शासनाने ही सुविधा सुरू केली आहे; मात्र, ग्रामीण भागातील दुकानातून अजूनही प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यातील थोड्याच दुकानदारांनी ही सुविधा देण्यासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या दुकानदारांना शासनाने निश्चित केलेल्या कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुठली सेवा कशी द्यायची, कशा पद्धतीने बिले भरायची याचे प्रशिक्षण यातून या दुकानदारांना दिले जाणार आहे. अन्य जिल्ह्यात ही सुविधा सुरू झाली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही प्राथमिक स्तरावर असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात ही सुविधा सुरू करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील दुकानदारांना सुविधा देण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी झाल्यानंतर संबंधितांना प्रशिक्षण दिले जाईल; मात्र जिल्ह्यात अजून सुविधा सुरू झालेली नाही.