स्त्री रोग तज्ञाविना जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची अडचण

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रस्तुती विभागात एकच स्त्री रोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. या एकाच डॉक्टरवर कामाचा अधिक ताण असून सध्या कौटुंबिक अडचणीमुळे संबंधित डॉक्टर 10 दिवस रजेवर गेले आहेत. यामुळे आता प्रस्तुती विभागात डॉक्टर नसल्याने खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने प्रसुती केल्या जात असल्या तरी रात्रीच्या वेळी मात्र कोणीही वैद्यकीय अधिकारी मदतीसाठी उपलब्ध होत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठा उभा प्रश्न उभा राहिला आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी आता रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असतानाही रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे यासाठी  डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमधील ‘पीजी’च्या डॉक्टरांची मदत होत आहेच मात्र आता रुग्णालयात एकही स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने प्रस्तुत्या करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. दिवसा काही ठराविक खासगी डॉक्टर यासाठी सहकार्य करतात मात्र रात्रीच्या वेळी रुग्ण आल्यास वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथे रुग्णांना पाठवावे लागत आहे.
अत्यावश्यक वाटल्यास डेरवण गरोदर मातांना हलवले जाते, अन्यथा नाही अशी माहिती प्रस्तुती विभागाने दिली.

दरम्यान, गेल्या 2 वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात एकच स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांना सुट्टीवर जाणेही अवघड होते. मात्र, यावेळी कौटुंबिक अडचण असल्याने 10 दिवस रजा अर्ज देऊन संबंधित डॉक्टर गावी गेले आहेत. खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावं यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी आवाहन केले होते. मात्र, केवळ 4 डॉक्टरांनी सहकार्य केले. रुग्णालयात रात्रीच्या वेळी तर एकही डॉक्टर मदतीसाठी नसल्याने जिल्हा रुग्णालयासमोर  रुग्णसेवा देताना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे