सर्वसामान्यांची लालपरीसुद्धा आता होणार हायटेक

रत्नागिरी:- रेल्वेप्रमाणेच सर्वसामान्यांची लालपरीसुद्धा आता हायटेक होणार आहे. एसटी महामंडळाकडून ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ सर्व एसटीमध्ये बसवण्यात येत असून, त्यांचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे. रत्नागिरी एसटी विभागात व्हीटीएसचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 760 एसटीमध्ये ही व्हिटीएस यंत्रणा बसवण्या आली असून, अंतिम चाचणी होणे बाकी असल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे एसटीचे लोकेशन कळावे यासाठी हे व्हिटीएस सिस्टीम बसविण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र मध्ये कोरोनामुळे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. रत्नागिरी जिल्ह्यातील 760 बसेसमध्ये व्हिटीएस सिस्टीम बसवून झाले आहे. 100 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ एकदा चाचणी घेणे बाकी आहे. संबंधित कंपनीचे अधिकारी याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर लवकरच जिल्ह्यातील बसेसचे लोकेशन एका क्लिकवर बघावयास मिळेल, असा विश्वास प्रज्ञेश बोरसे यांनी व्यक्त केले
आहे.

आज रेल्वेचे लोकेशन कुठेही गेले तरी कळते, त्याचप्रमाणे एसटी कोणत्या मार्गावर आहे, किती वाजता पोहचेल याची माहिती विकसित करण्यात येणार्‍या अ‍ॅपवर मिळणार आहे.