रत्नागिरीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढेंची धास्ती 

रत्नागिरी:- राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील जिल्हा रुग्णालयांना अचानक भेटी देण्याचे काम सुरू केले असून याची धास्ती रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही घेतली आहे. रत्नागिरीत मुंढे दोन आठवड्यापूर्वीच येणार होते, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने तशी तयारीही केली होती. आता जिल्ह्यात ते कधीही आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी दाखल होणार असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

 तुकाराम मुंढे यांची महिनाभरापूर्वी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी लगेचच राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर कोणत्याही जिल्ह्याला अचानकपणे भेटी देऊन आरोग्य यंत्रणा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याला मुंढे भेट देणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेपर्यंत आली होती. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयालाही मुंढे भेट देणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ते आले नाहीत.
आरोग्य सेवा आयुक्त कधीही जिल्हा दौर्‍यावर येऊ शकतात या धास्तीने कोणत्याही वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिवाळीत सुध्दा मुख्यालय सोडले नाही. कधीही आढावा घेतला तर कामचुकारपणा नको, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सगळ्या बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, असे मुंढे यांनी यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाते. मात्र मनुष्यबळ कमतरता हा विषय गेली अनेक वर्षे मार्गी लागलेला नाही. मनुष्यबळ असेल तर इतर वैद्यकीय सेवेचे प्रश्न मार्गी लागतील. सुविधा आणि यंत्रणा आहे, मात्र हे सगळे चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाहीत. सध्या जिल्हा शासकीय रुरग्णालयात वालावलकर हॉस्पिटलमधील पीजीचे डॉक्टर येऊन सेवा देत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना, वैद्यकीय अधिकार्‍यांचा काहीसा प्रश्न मार्गी लागला आहे.