कोरे कामगारांना बोनस द्या; कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा 

रत्नागिरी:- भारतीय रेल्वेच्या धर्तीवर कोकण रेल्वे कामगारांना बोनस मिळायला हवा, या मागणीसाठी कोकण रेल्वे व्यवस्थापनाविरोधात २१ ऑक्टोबरला हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कोकण रेल्वेमधील मंगलोरपासून ते रोह्यापर्यंतचे असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच बेलापूर येथील फायनान्स विभागाच्या डायरेक्टरना निवेदन देण्यात आले. कर्मचार्‍यांना पूर्ण बोनस न दिल्यास नाताळच्या सुट्टीत कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बाधित होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे (केआरसीईयू) अध्यक्ष सुभाष मळगी यांच्याबरोबर रेल कामगार सेना, कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन तसेच कोकण रेल्वे एससी-एसटी असोसिएशन आणि ओबीसी असोसिएशन यांनी एकत्रितरीत्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले होते. रेल्वे मंत्रालय प्रवासी तिकिटावर सबसिडी देते. त्याप्रमाणे कोकण रेल ही कॉर्पोरेशन असल्याने ५३ टक्के रक्कम केंद्र सरकार कोकण रेल्वेला देणे बंधनकारक आहे आणि ती रक्कम करोडोमध्ये असल्याने कामगारांसाठी खूप काही करता येऊ शकते, असे श्री. मळगी यांनी सांगितले. भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देणे शक्य आहे. या हल्लाबोल मोर्चात एससी-एसटी असोसिएशनचे नारायण दास तसेच ओबीसी असोसिएशनचे रामनाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी राजू सुरती, मिनाज झारी, राहुल पवार, किशोर सावंत, दळवी, रवी गुजर, दत्त तेलंगे, गजा गायकर, मुरुगेशान, प्रमोद, राजा कुट्टी, चंद्रकांत विनरकर, मनोज निकम, भुसारे ,योगेश भोईर, विजय आव्हाड यांनी मेहनत घेतली.