जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीतील नोकर भरतीत अपहार

संचालक प्रदीप वाघोदे यांचा आरोप

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीमध्ये सुरु असलेल्या नोकरभरतीबाबत मोठ्या प्रमाणात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भरतीमागे मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार असल्याचे सभासदांमधून बोलले जात असल्याचा आरोप विद्यमान संचालक प्रदीप वाघोदे यांनी केला आहे.

 नुकत्याच झालेल्या आधिमंडळ सभेमध्ये सर्व सभासदांनी सर्वानुमते दुरूस्ती व नोकर भरतीला कडाडून विरोध केला होता. सभासदांच्या मताचा विचार न करता अत्यंत घाईघाईने संचालक मंडळाच्या 5 ऑक्टोबरच्या सभेमध्ये नोकरभरतीचा विषय प्रथम चर्चेसाठी आणला व  22 नोव्हेंबरच्या सभेपूर्वीच संबंधित उमेदवारांची निवड ही करण्यात आली. हा सर्व प्रकार संशयास्पद व बेकायदेशीर असल्याचे संचालक प्रदीप वाघोदे यांनी स्पष्ट केले.  

बेकायदेशीर नोकरभरती बरोबरच दुरुस्तीला सभासदांचा सर्वानुमते विरोध असतानादेखील  मंडणगड शाखेच्या दुरूस्तीवर जवळपास 2 लाख 50 हजार व रत्नागिरी शाखेच्या दुरूस्तीवर जवळपास 1 लाख 50 हजार इतका खर्च संचालक मंडळाने मंजूर करून घेतला असल्याचे प्रदीप वाघोदे यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकाराला विद्यमान संचालक प्रदीप वाघोदे,अनंत जाधव व महेंद्र साळगांवकर यांनी लेखी विरोध केला आहे. सध्या पतपेढीच्या नोकर भरतीसंदर्भात एक याचिका न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. या भरतीसंदर्भात दिनांक 19/09/2018 रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेतील विषय क्रमांक 2 नुसार जो उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये नसतानाही त्याची निवड करण्याबाबत आग्रह एका विद्यमान संचालकांनी धरला होता त्याच उमेदवाराची पुन्हा यावेळी निवड करण्यात आली असल्याचे वाघोदे यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यासंदर्भात उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 आता तरी थांबा .. अन्यथा अध्यापक संघ रस्त्यावर उतरेल : सागर पाटील

  माध्यमिक पतपेढीमध्ये विद्यमान संचालक मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं अनेक गैरप्रकार केले जात आहेत. सभासदांचा कडाडून विरोध असतानाही  बेकायदेशीर पध्दतीने नोकरभरती करण्यात येत आहे व दुरुस्तीवर अनावश्यक लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.विद्यमान संचालक मंडळाची मुदत एक वर्षापूर्वी संपलेली असतानाही बेकायदेशीर निर्णय व आर्थिक उधळपट्टी सातत्यानं सुरूच आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आत्ता तरी थांबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. प्रस्तावित नोकरभरती व शाखा दुरुस्तीचा प्रस्ताव स्थगित न केल्यास अध्यापक संघाला रस्त्यावर उतरावे लागेल असे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी स्पष्ट केले.