आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न?

चिपळूण:- शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पाग येथील बंगल्यावर भ्याड हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेतलं जात नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. या घटनेमुळे चिपळूण पोलीस स्थानकाच्या आवारात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून राजकीय टीका- टिप्पणीला जोर धरला आहे. चिपळूणातील भास्कर जाधव यांच्या आक्रमक भाषणानंतर प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्या.

या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख सचिन कदम, बाळा कदम, संदीप सावंत, फैसल कास्कर, मोहन मिरगल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलिसांवर धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना घेराव घालण्यात आला.

अचानक बंदोबस्त का हटवला?

भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, अशा प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. तसेच या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त काढून घेणे व देणे आपल्या अखत्यारीत नाही. तरी देखील या हल्ल्याची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र शिवसैनिकांनी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.