पालकमंत्र्यांकडून शासकीय कार्यालयांची झाडाझडती

रत्नागिरी:- उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकरी कार्यालयातील दुरवस्था झालेली स्वच्छतागृह, रहाट घर येथील रस्त्याची दुरावस्था व अस्वच्छता यांची प्रत्येक्ष पाहणी करून संबंधितांना दोन दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. जेवण पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीने मस्टरवर (हजेरीपट) २३ कामगार दाखवून १० कामगारांमध्ये काम करून घेत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी मंत्री सामंत यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्याचे भेटी दरम्यान त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. याची गंभीर दखल त्यांनी घेऊन याची शहानिशा करण्यासाठी अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वजाण्याच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. तेथील स्वच्छतागृहाच्या दूरवस्थेबाबत तक्रार होती. यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव, बांधकाम विभागाचे अधिकारी सोबत होते. या स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसल्याने दुर्गंधी पसरली होती. यासंदर्भात तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना याबाबत आम्ही सांगितले होते, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती असल्याचे सांगितले. यावर मंत्री सामंत यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचे प्रतिनिधी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उद्याच्या उद्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व स्वच्छतागृहांची साफसफाई झालीच पाहिजे. त्यानंतर दर दोन दिवसांनी पालिकेचे कर्मचारी ही साफसफाई करतील. त्यांचे योग्य मानधन तहसील कार्यालयाकडून दिले जाईल. त्यानंतर मंत्री यांनी थेट रहाटघर गाठले. या बसस्थानकाच्या परिसरात खड्डेच खड्डे आणि साचलेले पाणी होते. अस्वच्छता दिसत होती, या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून दोन ते चार दिवसांमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले.  

एवढ्यावर न थांबता त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिले. सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. रुग्णांना जेवण पुरवणाऱ्या किचनला भेट दिली. तेथील महिलांशी चर्चा केली. स्वच्छतेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या. कर्मचाऱ्यांनी आपल्याला वेळेवर आणि पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार केली. सामंत यांनी संबंधित ठेकेदाराबाबत माहिती घेतली. ठेकेदार कंपनीने मस्टरवर २३ कामगार दाखून त्याचे मानधन घेतले जात आहे. परंतु प्रत्यक्षात १० कामगारच कामावर आहेत. उर्वरित १३ कामगारांचे मानधन कोणाच्या खिशात जाते, असा सवाल करीत जेवढ्या दिवसात त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवले आहे, तेवढी वसूली करून घ्या आणि किमान कामगार वेतनाप्रमाणे त्यांना मानधन द्या, अन्यथा संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शल्यचिकित्सकांना दिले.