परतीच्या पावसाचा फायदा; शीळ धरण वाहतेय ओसंडून 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण अजून ओसंडून वाहत आहे.  जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून धरणातील पाणी ओसंडून वाहण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी ओसंडून वाहणारे हे धरण काठोकाठ होत असते. परंतु, यावर्षी परतीच्या जोरदार पावसामुळे दसरा संपल्यानंतरही ओसंडून वाहत आहे.

शीळ धरणातून संपूर्ण रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या धरणात 5 ते 6 जूनपर्यंत पुरेल इतका म्हणजे 0.589 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा होता. त्यामुळे पाऊस लांबला तर शहराला पाणीटंचाई भेडसावणार होती. परंतु पावसाने जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून दमदार सुरुवात केली आणि धरणातील पाणीसाठा वाढत गेला. जूनच्या  शेवटच्या आठवड्यापर्यंत हे धरण ओसंडून वाहू लागले. दरवर्षी हे धरण पावसाळ्यात ओसंडून वाहते आणि दसर्‍याच्या सुमारास पाणी काठोकाठ होते.

यंदा दसर्‍यापर्यंत धरणातील पाणीसाठा काठोकाठ होत असतानाच परतीचा जोरदार पाऊस बरसला. गत आठवड्यात पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली. त्यामुळे दसर्‍यानंतरही धरणात पाणीसाठा वाढून धरण ओसंडून वाहू लागले आहे. रत्नागिरी नगर परिषदेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणातून पाणी घेणे बंद केले आहे. पानवल धरणातील पाणीपुरवठा बंद आहे, अशा परिस्थितीत आता शीळ धरणात मुबलक पाणीसाठा असून, पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
आहे.