जिल्ह्यात लवकरच मरीन प्रकल्प; तीन जागांची पाहणी

रत्नागिरी:- रोजगार निर्मीतीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मरीन पार्क उभारण्यावर भर दिला आहे. आठ दिवसात प्रकल्प अहवाल तयार करुन राज्य शासनाला सादर करण्यात आला. मत्स्य प्रक्रिया उद्योगातून निर्यातवृध्दीसह रोजगाराला चालना मिळणार असल्याने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तो बनविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकर जागा अपेक्षित असून जयगड, रत्नागिरी शहराजवळील स्टरलाईटची आणि लोटे एमआयडीसी या तीन जागांचा विचार सुरु आहे.

जिल्ह्यातील बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योगमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर उदय सामंत यांनी लॉजेस्टिक पार्क, मँगो आणि मरीन पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या मदतीने रत्नागिरीत हे पार्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत इंटिग्रेटेड मरीन पार्क विकसित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. प्राथमिक अहवालानुसार प्रकल्पात २०० कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि जवळच्या भागातील मच्छीमार, उत्पादक, प्रक्रिया करणारे आणि ग्राहकांना मोठा फायदा होईल असे नियेाजन केले जाणार आहे. प्रकल्पासाठी दीडशे एकर भूखंड अपेक्षित असून त्यात माशांवरील प्रकिया युनिट्स उभारली जाणार आहेत. प्रकल्पांच्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि सांडपाणी प्रणालीसह सांडपाणी प्रक्रिया सुविधांसह पायाभूत सुविधाही दिल्या जातील. प्रकल्पाला रत्नागिरीतील जयगड, स्टरलाईट्सची जागा आणि लोटे परशुराम औद्योगिक परिसरातील जागांचा विचार सुरु आहे. माशांची हाताळणी करण्यासाठी मोठ्या बंदरांजवळ पुरेशी जागा उपलब्ध झाली तर त्याठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा विचार सुरु आहे. या पार्कसाठी आवश्यक सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उपलब्ध करुन देणार आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. आता विस्तृत अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे मरीन पार्कचे स्वप्न साकार होण्यासाठी पुढील पाऊल उचलले गेले आहे.