जिल्ह्यात तीन लाख मुलांना देण्यात येणार जंतनाशक गोळी

रत्नागिरी:- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पौगंडावस्थेतील मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. शाळा, अंगणवाडी, शिक्षणा संस्थांसह समुदायस्तरावर घरोघरी जावून २ लाख ९३ हजार ३५९ लाभार्थींना याचे वाटप करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्तेतील मुलामुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणार्‍या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेतील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच १० डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम आणि १७ डिसेंबर रोजी मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. परिक्षित यादव यांच्या कार्यालयात बैठक झाली. ग्रामीण आणि शहरी लाभार्थीनी मोहिमेत आपल्या १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळीचा लाभ दिला जाणार आहे. या मोहिमेमुळे मुला-मुलींचे शारीरिक मानसिक व बौध्दिक विकास होण्यास मदत होते. १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मोहिम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ३७८, शाळा ३१५१ आणि अंगणवाडी २२६१ अशा एकुण ६ हजार ४६७ संस्थात समुदायस्तरावर घरोघरी जावून, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील २ लाख ९३ हजार ३५९ लाभार्थींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाईल.