सततच्या पावसामुळे हळव्या भातशेतीसह नाचणी पिकाचे नुकसान

रत्नागिरी:- सतत कोसळणार्‍या पावसामुळे पसवलेल्या हळव्या भातशेतीचे तसेच नाचणी पिकाचे नुकसान होत आहे. कोकणातील शेती ही पावसावर अवलंबून असलेली आहे. पाऊस बरसतो तेव्हा डोंगर उतारावरून वाहणारे पाणी शेतीत घेऊन लावणी करण्यात येते. मोसमी पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीला डोंगर उतारवरून वाहणारे पाणी आटल्यावर पुरेसे पाणी मिळत नाही म्हणून येथे लवकर होणारी भातशेती लावली जाते. त्याला येथे हळवी भातशेती म्हणतात. सध्या ही लावण्यात आलेली भातशेती पिकल्याने पिवळी धमक होत चालली आहे.

चार दिवसात पावसाचे वातावरण बघून भातशेती कापण्याच्या तयारीत शेतकरी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणार्‍या पावसाने बहुतेक ठिकाणची भातपिके, नाचणी आडवी केली आहे.
सध्या शेताच्या चौंड्यात पाणी साचल्याने कापलेले भात वाळवायचे कुठे? याची चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. त्यामुळे भात कापण्याचे धाडस कोणीसुध्दा करत नाही. तसेच नाचणी आडवी झाल्याने वेचणी करणे अवघड होणार असल्याचे पाटपन्हाळेतील शेतकरी सुभाष रावणंग यांनी सांगितले.

यावर्षीच्या पावसाच्या हंगामात भातशेतीसाठी पाऊस समाधानकारक झाल्याने शेती चांगलीच तरारली होती. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून येथे कोसळणार्‍या पावसामुळे भातशेतीमध्ये सगळीकडे पाणीच-पाणी झालेले आहे. त्यात भात पीक तयार झाल्याने तर काही ठिकाणची भातशेती हरड्यावर आली आहे. मात्र, वादळी पावसामुळे या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.