कै. सुरेश उर्फ बाळशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ साळवी स्टॉप येथे फिल्टर पाणपोईचे लोकार्पण

रत्नागिरी:- शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथे येणाऱ्या नागरिक आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकासाठी पिण्याचे पाणी हा मोठा प्रश्न होता. हीच समस्या लक्षात घेत येथील उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी त्यांचे कै. वडील सुरेश उर्फ बाळशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ साळवी स्टॉप येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि येथील कामगार वर्गासाठी पिण्याच्या पाण्याची कायमची व्यवस्था केली आहे. साळवी स्टॉप येथे फिल्टर असलेली पाणपोई उभारण्यात आली असून नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले. 

सौरभ मलुष्टे यांच्या वाढ दिवसानिमित्त कै. बाळशेठ मलुष्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साळवी स्टॉप येथे पाणपोई आणि मोफत वाचनालय ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. जेष्ठ उद्योजक आण्णा सामंत यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. उभारण्यात आलेली पाणपोई फिल्टर असणार आहे. तसेच या ठिकाणी साधे, थंड आणि गरम या तिन्ही प्रकारचे पाणी उपलब्ध असणार आहे.

साळवी स्टॉप हे शहराचे प्रवेशद्वार आहे. शहरात येणारा प्रत्येकजण या ठिकाणी हजेरी लावून शहरात दाखल होतो. याशिवाय या भागात ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे मोठे जाळे आहे. या कामानिमित्त साळवी स्टॉप भागात येणाऱ्या हमाल कामगारांची संख्या देखील मोठी आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि हमाल कामगारांची पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने सौरभ मलुष्टे यांनी ही पाणपोई उभारण्याचा निर्णय घेत याचे लोकार्पण केले. याशिवाय या परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी मोफत वृत्तपत्र वाचनालयाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याच ठिकाणी वृत्तपत्र वाचनालय उभारण्यात आले असून बैठक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.