प्रतिष्ठेच्या शिरगाव सरपंच पदासाठी चौरंगी लढत

सदस्य पदाच्या शर्यतीतून 20 जणांची माघार

रत्नागिरी:- तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. यात सर्वात लक्षवेधी ग्रामपंचायत असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय फणसोप मध्ये दुरंगी आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे.

तालुक्यातील चरवेली, फणसोप, शिरगाव आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. चरवेली गावात गाव पॅनल मार्फत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी बुद्रुक या ठिकाणी निवडणुकीचे घमासान रंगणार आहे. तिन्ही ठिकाणी महविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट युतीचा सामना रंगणार आहे. तर लक्षवेधी राहिलेल्या शिरगाव गावच्या सरपंच पदासाठी चौरंगी लढत रंगणार आहे. शुक्रवारी अर्ज माघे घेण्याच्या मुदतीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. या कालावधीत केवळ पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायती मधील सरपंच पदासाठीचा केवळ एक अर्ज मागे घेण्यात आला असून इतर तीन अर्ज कायम असल्याने या ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. लक्षवेधी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी चौरंगी तर फणसोप ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत रंगणार आहे 

सदस्य पदासाठी रिंगणात असलेले 20 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता सदस्य पदासाठी 96 उमेदवार रिंगणात आहेत. यात फणसोप मधील 11 जागांसाठी 17 उमेदवार, पोमेंडी बुद्रुक मधील 11 जागांसाठी 31 उमेदवार तर शिरगाव मधील 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत.