गुहागर येथे लघुशंकेच्या बहाण्याने आरोपीने काढला पळ

गुहागर:- लघुशंका झालेय, मला थांबवा असे सांगून लघु शंकेला गेलेल्या आरोपीने तिथून जंगलात पलायन केल्याची घटना आज घडली. या घटनेने गुहागर मध्ये खळबळ उडाली आहे. शिवराम नारायण साळवी (52) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथील एका आरोपीला पोलिस दुचाकीवरून चिपळूण न्यायालयात घेऊन गेले होते. न्यायालयात त्याचे जबाब घेतल्यानंतर पुन्हा गुहागरच्या दिशेने नेण्यात येत होते. आज शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलिस दुचाकीवरून घेऊन जात असताना चिखली येथे संशयित आरोपी शिवराम साळवी याने मला लघुशंकेला जायचं आहे असे सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे पोलिसाने गाडी थांबवून उतरवले. लघुशंकेच्या बहाण्याने तो बाजूला गेला. आणि तिथूनच त्याने जोरात धूम ठोकली. तो जंगलच्या दिशेने सुस्साट पळत सुटला. पोलिसाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र असफल ठरला. आरोपी पळल्याची बातमी गुहागर पोलिस स्थानकात कळल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. गुहागरमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे.