मांडवी येथे समुद्रात जाणाऱ्या चॅनेलमध्ये फसल्या नौका

रत्नाागिरी:- राजीवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप येथील मच्छीमारांना सध्या वेगळ्या आणि गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. खोल समुद्रातून एक, दोन दिवस मासेमारी केल्यानंतर परतीच्या प्रवासात मांडवी येथील चॅनल (समुद्री मार्ग) गाळाने भरल्याने ओहोटीदरम्यान दोन नौका गाळात फसल्या. कसरत करत अर्ध्या तासानंतर कसाबसा मार्ग काढून ते पुढे सरकले. गाळाने हा चॅनल भरला असून मच्छीमारींना येता-जाता वाट काढताना धडकी भरते.

मासेमारी करून काही मच्छीमार काल सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्याने परतत होते. ओहोटी असल्याने राजीवड्याकडे जाणाऱ्या समुद्रमार्गात एवढा गाळ साचला होता की, दोन मार्ग तयार झाले होते. छोटे बोटलीवाले मच्छीमार मासेमारी करून आल्यानंतर काहींनी भाटे पुलाकडील मार्ग निवडला तर काहींनी मांडवी बंदराच्या बाजूने राजीवड्याकडे जाणारा मार्ग निवडला आणि फसले. तीन छोटे मच्छीमार बोटली घेऊन जात असताना मार्गात असलेल्या गाळात फसले. अखेर इंजिन बंद करून बांबूच्या मदतीने खोली चाचपत त्या बाजूने छोटी नौका वळत हळुहळू पुढे सरकत गेले. सुदैवाने, या वेळी मच्छीमार एकमेकांना मदत करतात. त्यामुळे एकमेकांच्या विचाराने हे मच्छीमार पुढे सरकतात. फसलेल्या तिन्ही मच्छीमारांना राजीवडा पुलाखाली जाण्यास अर्धा ते पाऊण तास लागला. एकदाचे खोल पाण्यात गेले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हा प्रकार संपतो ना संपतो तोवर मोठी मच्छीमारी नौका मासेमारीसाठी खोल समुद्रात निघाली होती. ती देखील राजीवडा बाजूच्या चॅनलने पुढे सरकत होती. एवढ्यात मांडवी येथे खडकाळ भाग दाखवण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्तंभाजवळ ही नौका फसली. ती पुढेही जात नव्हती आणि पाठीही येत नव्हती. यामुळे तांडेल आणि खलाशी चांगलेच गडबडून गेले. ध्वनिक्षेपकावर एकमेकांना सूचना देऊ लागले. अन्य मच्छीमारांच्या मदतीने फसलेल्या या नौकेचा मार्ग बदलला आणि ती पुढे समुद्रात गेली. दरदिवशी मच्छीमारांना ही तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मच्छीमारांनी लवकरात लवकर या चॅनलमधील गाळ काढण्याची मागणी केली आहे.शासनाने कोणत्याही मोठ्या अपघाताची वाट न पाहता गाळ काढून चॅनल रिकामा करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे. भरती-ओहोटीच्या वेळापत्रकावर मच्छीमारांना ये-जा करावे लागत आहे.