मरिन पार्क प्रकल्पातून जिल्ह्यातील १२ ते १५ हजार लोकांना रोजगार: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीत मरिन पार्क उभारण्यासाठी आठ दिवसात आराखडा तयार केला आहे. ३५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून जिल्ह्यातील १२ ते १५ हजार लोकांना रोजगार मिळेल. मँगो पार्कमधूनही तेवढाच रोजगार मिळू शकतो. तर जेएसडब्ल्यू कंपनीही ५ हजार कोटीची गुंतवणुक करुन विज निर्मिती प्रकल्प उभारत असून त्यामध्ये ५५० स्थानिकांना कायमस्वरुपी तर १२०० लोकांना कंत्राटी तत्वावर रोजगार मिळेल, असे प्रतिपादन  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

दोन दिवसीय निर्यात परिषद व प्रदर्शन उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील अरिहंत मॉल मधील टिळक सभागृहातील परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उद्योग सहसंचालक एस. आर. लोंढे, सहसंचालक कोकण विभाग सतीश भामरे, सिडबीचे उपमहाव्यवस्थापक रहाटे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदींची उपस्थित होते. ते म्हणाले, रत्नागिरीतील उद्योजक स्वतःच्या पायावर उभे राहीला पाहीजे, त्याला राजाश्रय मिळावा हा उद्देश आहे. या निमित्ताने रत्नागिरी जिल्हयात नवीन उद्योजक, निर्यातदार तयार होतील. स्टरलाईट उद्योग समूहसाठी ५०० एकर जागा एमआयडीसीने १९९२ मध्ये दिली. त्यावर उद्योग उभारण्यात आलेला नाही. याबाबत शासनाने न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी अद्यापही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले नाही. येणार्‍या १२ ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया सुरु होत आहे. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी इतर उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकातील हजारोंना रोजगार मिळेल याबाबत पावलं उचलली जात आहेत. कोरोना काळात देशातील ४ ठिकाणी ड्रगपार्क (औषध कारखाने ) उभारण्याचा निर्णय झाला याला याआधीच्या सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका बसला व रायगड जिल्हयात एक इंचही जागा उपलब्ध करुन दिली गेली नाही. कुणावरही अवलंबून न रहाता हा ड्रगपार्क महाराष्ट्रात होईल याचीही खबरदारी आम्ही घेत आहोत. जेएसडब्ल्यू कंपनीबरोबर नुकतीच बैठक घेतली. ५ हजार कोटीची गुंतवणुक असलेला विज निर्मिती प्रकल्प ते करणार आहेत. त्यामधून ५५० लोकांना कायमस्वरुपी तर १२०० लोकांना कंत्राटी तत्वावर रोजगार मिळणार आहे.
राज्यात औषध पार्कसाठी (ड्रग्ज पार्क) २० ऑक्टोबर २०२० ला प्रस्ताव आला होता. मागील दोन वर्षात रोहा, मुरुड येथील एक इंच जमीनही त्यासाठी दिली गेली नाही. उद्योगमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रकल्प यावेत यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र शासनावर अवलंबून न राहता महाराष्ट्र शासन औषध पार्क उभे करणार आहे. त्यासाठी ५० हजार कोटीची गुंतवणूक करण्यात येईल. काही जणं लोकांमध्ये जाऊन संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. आंदोलने करुन काहीजणं खोटे सांगत फिरत आहेत. त्या सगळयांना सांगायचे आहे की भविष्यात रोजगारासाठी आम्ही काम करणार आहोत. नवीन उद्योग आणण्यासाठी रत्नागिरीत जे करावे लागेल बेरोजगारांसाठी जे लागेल ते करण्यासाठी उदयोग मंत्री झालो आहे. किती लोकांना रोजगार दिला पुढील वर्षभरात मी जाहीर करेन. वेदांत असला काय नसला काय, पण त्या तोडीचा प्रकल्प आणून राज्याला रोजगार उपलब्ध करुन देणार आहे.