खानुतील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

रत्नागिरी:- गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून वृद्ध शेतकर्‍याला गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील खानू येथे घडली. सुरेश गंगाराम सुवारे (वय ५५) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दूपारी अडीच वा.च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गंगाराम सुवारे हे नेहमीप्रमाणे खानू येथील जंगलात गवत कापण्यासाठी गेले होते. त्यांच्या आजूबाजूला अन्य शेतकरी होते. दुपारच्या वेळेस गवत कापत असताना अचानक बिबट्याने त्यांच्या अंगावर उडी मारली आणि मानेचा ढास मारायला सुुरुवात केली. बिबट्याच्या हल्ल्यानंतर सुवारे यांनी आपली मान बिबट्याच्या तोंडात जाणार नाही यासाठी मान खाली वाकवली आणि त्याला प्रतिकार करू लागले. त्यातच ते आरडाओरडही करत होते.

चवताळलेला बिबट्या सुवारे यांच्यावर तुटून पडला होता. त्याचवेळी गवत कापणार्‍या इतर शेतकर्‍यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्या शेतकर्‍यांनी सुवारे यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. शेतकरी हातात काठ्या घेऊन धावताच बिबट्या धूम ठोकून पळून गेला.

या हल्ल्यात सुरेश सुवारे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना पाली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरीता जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.