अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई थेट खात्यात

रत्नागिरी:- चालू हंगामात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने झालेली पीक नुकसानाची भरपाई 17 सप्टेंबरपासून देण्यात येत असून, ती शेतकर्‍यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तशा सूचना शासनाने दिल्या असून कृषी विभागाने पीक नुकसानीचे संकलन करण्याची तयारी केली आहे.
खरीप पिकातील नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटातून दिलासा मिळणार आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना पुढील पीक घेताना होणार आहे. सध्याच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर होत
आहे.  

मागील काळातही शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना मदत निधी देण्याची प्रक्रिया 17 पासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर मोबदला दिला जाईल.
यामध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना मदतीची रक्कम दिली जाईल, त्याअंतर्गत शेतकर्‍यांना पिकानुसार 27 हजार ते 36 हजार प्रति हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांना मिळणार आहे.