गणेशोत्सव कालावधीत अनधिकृत धंद्यांवर पोलिसांची मोठी कारवाई 

 रत्नागिरी:- गणेशाोत्सवात पोलिसांनी जिल्ह्यांत अवैध धंद्यावर मोठी कारवाई केली. यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे एकूण ६९ केसेस केल्या असून ४ लाख ६ हजार १४० रुपयांची २ हजार १०६ लिटर दारु जप्त करण्यात आली.तर महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्याप्रमाणे 18 केसेस करण्यात आल्या यामध्ये रोख २ लाख ९४ हजार ५६६ रुपये जप्त करण्यात आले आहेत.

उत्सवाचा फायदा घेऊन कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यात उपद्रव ठरु शकणाऱ्या व्यक्तींविरुध्दही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम १०७ नुसार १२७ जणांवर, कलम १४९ नुसार ३३२ जणांवर आणि कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम नुसार २४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.या व्यतिरिक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून शांतता राखण्यासाठी कलम १०७ नुसार ४५ अंतरिम बंधपत्रे आणि २९ अंतीम बंधपत्रे घेण्यात आली. त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी ५३६ गावांना ग्रामभेट व तेथे स्थानिक नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. गणेशोस्तव शांततेत पार पाडण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ पोलीस अधिकारी व ३९३ पोलिस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक व १ क्युआरटी असा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. या पोलिस दलाव्यतिरिक्त महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथुन १० प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथून ५० नवप्रविष्ठ पुरुष व  पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, सांगली येथून २५ नवप्रविष्ठ महिला पोलिस अंमलदार, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. २, पुणे येथून २ प्लाटून्स, रत्नागिरी जिल्हयातील जिल्हयातील गृहरक्षक दलाचे २९४ जवान असा अतिरिक्त बंदोबस्त प्राप्त झालेला होता. या उत्सवानिमित्त नेहमी प्रमाणे मुंबई व अन्य शहरांत, गावांत असलेले कोकणातील मुळ रहीवासी हे रत्नागिरी जिल्ह्यांत रायगड, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातुन प्रवेश करतात. या पैकी रायगड मधुन येणार्‍या भाविकांचे जास्त प्रमाण असल्याने, भाविकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (मुंबई ते गोवा) या महामार्गावर आंबा पाँईट, कशेडी, खेड, ते राजापूर एसटी डेपो पर्यंत तात्पुरत्या स्वरुपातील एकुण २० पोलिस मदत चौक्या/राहुट्या राष्ट्रीय महामार्ग आस्थापना यांच्याशी समन्वय राखुन त्यांच्या सहकार्याने उभारण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पोलिस विभागाकडून ८ अधिकारी, ७२ अंमलदार बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेले होते. रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासाचा थकवा येऊ नये यासाठी, जेणेकरुन संभाव्य अपघात टाळण्याचा दृष्टीकोनातून राहुट्यांमध्ये भाविकांना विनाशुल्क चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. वरील सर्व नियोजनामुळे व पोलिस दलातील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे प्रयत्न व रत्नागिरीवासीयांच्या सहकार्याने यंदाचा गणेशोत्सव सण कोणताही कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येविना शांततेत झाला.