वादळसदृश्य परिस्थितीचा मच्छीमारांना फटका; मासेमारी बंद 

रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला असून पाण्याला करंट असल्यामुळे गिलनेटधारकांनी बंदरातच उभे राहणे पसंत केले आहे. पर्ससिननेटसह ट्रॉलिंगवाल्यापैकी बहूसंख्य मच्छीमारांनी बंदरात नौका उभ्या केल्या आहेत. काहींनी धोका पत्करला असला तरीही खोल समुद्रात जाणे टाळले आहे. बदलेल्या वातावरणाचा मच्छीमारीवर परिणाम झाला आहे.

हवामान विभागाने तिन दिवसांचा अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवर हलके वारे वाहत असून पाण्यालाही करंट आहे. गेले दोन दिवस ठिकठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. वादळामुळे खोल समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. या परिस्थितीमध्ये खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे शक्य नसल्याने अनेक मच्छीमारांनी नौका किनार्‍यावर उभ्या करुन ठेवल्या आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाच्या दोन महिन्यामध्ये मासेमारी करताना बदलत्या वातावरणाला वारंवार सामोरे जावे लागत आहे. ट्रॉलिंग, गिलनेटसह छोट्या नौकांद्वारे मासेमारी करण्यास १ ऑगस्टपासून आरंभ झाला. परंतु वादळी वातावरणामुळे मच्छीमारांना वारंवार ब्रेक घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेले दोन दिवस मासेमारीत आलेल्या अडथळ्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तिच परिस्थिती पर्ससिननेट मासेमारीची आहे. १ सप्टेंबरपासून मासेमारीला आरंभ झाला. पण सुरवातीलाच खराब वातावरणामुळे खोल समुद्रात मासेमारी करणे धोक्याच ठरत आहे. पर्ससिननेटला १५०-२०० डिश (३२ किलो एक डिश) उष्टी बांगडी हा मासा मिळत आहे. हा फिशमिलला प्रक्रियेसाठी दिला जातो. एका डिशचा दर सर्वसाधारणपणे ५५० रुपये मिळतो. खोल समुद्रात वातावरण बिघडल्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाची प्रतिक्षा आहे.