वेळणेश्वर समुद्रात नौका बुडाली; नौकेतील तिघाजणांना वाचवण्यात यश

गुहागर:- मागील दोन दिवसांपासून समुद्रातील खराब झालेल्या वातावरणामुळे गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रात नौका बुडाली. समुद्रात बुडालेल्या मासेमारी नौकेतील तीन मच्छिमारांना गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे वाचविण्यात यश आले. 

शुक्रवारी सायंकाळी वेळणेश्र्वरच्या समुद्रात मेरुमंडल  येथील खडकाळ भागात कोंडकारुळची मच्छीमार नौका उलटली. गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छीमार यशवंत गंगाजी झर्वे (वय ५८, रा. जांभुळवाडी), संजय लक्ष्मण जागकर (४०, रा. लक्ष्मीनगर) आणि विलास लक्ष्मण जागकर (६२, रा. नामदेववाडी) हे शुक्रवारी दुपारी १ वाजता छोटी मच्छीमार नौका घेवून वेळणेश्वरच्या दिशेने मच्छीमारीसाठी निघाले होते. दरम्यान त्यांची नौका वेळणेश्वर येथील मेरुमंडल या खडकाळ भागात आली. मोठ्यालाटेने नौका अचानक पलटी झाली. बोटीतील तिन्ही मच्छीमार समुद्रात पडले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. 

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस कादवडकर त्यांच्या काही सहकाऱ्यांसह समुद्रावर उपस्थित होते. समुद्रात मच्छीमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्वर सरपंच चैतन्य धोपावकर यांना कळविले. धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली आणि या तिन्ही मच्छीमारांना सुखरुप समुद्रकिनाऱ्यावर आणले.