पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकांची प्रौढाला मारहाण

रत्नागिरीः– पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकाने प्रौढाला मारहाण केली. या प्रकरणी संशयित दोन रिक्षाचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

राजेश नामदेव नागवेकर (वय ४८) व ज्ञानेश काशिनाथ वाडकर (४३, दोघे रा. शिळ, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ५) दुपारी तीन ते चारच्या सुमारास कांचन हॉटेल ते हनुमाननगर रस्त्यावर असलेल्या पुलाखाली घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राजाराम वाडकर (वय ५२, रा. मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) हे व संशयित एकमेकांचे ओळखीचे रिक्षाचालक आहेत. एकाच गावात राहतात व रिक्षा चालवतात. पूर्वी झालेल्या वादविवादाचा राग मनात ठेवून संजय वाडकर हे घरी जात असताना संशयित राजेश याने त्यांना धरून ज्ञानेश याने लोखंडाच्या रॉडने मारहाण करून दुखापत केली. तसेच हाताच्या ठोशाने लाथाबुक्क्याने मारले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.