कोकण रेल्वे मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवला 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर माणगाव येथे मंगळवारी गणपती विशेष रेल्वे गाडीचे डबे न उघडल्यामुळे संतप्त प्रवाशांनी दगडफेक केली. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सायंकाळनंतर सर्वच रेल्वेस्थानकांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला. सर्व डब्यांचे दरवाजे उघडे राहतील याची विशेष काळजी रेल्वे पोलिस घेत होते. त्यामुळे सायंकाळनंतरचा प्रवास सुरळीत झाला; परंतु यंदा अपेक्षेपेक्षा अधिक चाकरमानी कोकणात दाखल झाल्याने परतीच्या प्रवासावेळी कोकण रेल्वे पूर्णतः भरुन मुंबईकडे रवाना होत होत्या.

मडगाव, सिंधुदुर्गकडून येणार्‍या सर्वच गाड्या खचून भरलेल्या असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होती. खेड स्थानकावर मंगळवारी रात्री डब्यांचे दरवाज न उघडल्यामुळे प्रवाशांमध्ये तु तु मै मै झाली होती. वेळीच रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यावर पडदा पडला. गाड्यांमध्ये बसण्यासाठीच नव्हे तर उभे रहायलाही जागा नव्हती. रत्नागिरी स्थानकातही सलग दुसर्‍या दिवशी सायंकाळी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांबरोबर स्थानिक पोलिसांचं पथक नियुक्त केले होते. यामध्ये एक उपनिरीक्षक आणि दोन कॉस्टेबलचा समावेश होता. तसेच प्रवाशांनी भरगच्च झालेल्या गाड्यांमध्ये तिन रेल्वेचे गार्ड नियुक्त केले होते. गाडी स्थानकावर आल्यानंतर सर्व डब्यांचे दरवाजे उघडे राहतील याची काळजी घेतली जात होती. मंगळवारी सायंकाळी आठ वाजल्यानंतर दोन गणपती विशेष गाड्या मुंबईकडे रवाना झाल्यामुळे तुतारी, कोकणकन्या या दोन गाड्यांवरील भार कमी झाला होता. संगमेश्‍वर, चिपळूण, खेड स्थानकावरही याच पध्दतीने नियोजन करण्यात आले होते. आरक्षीत डब्यांमध्ये अनेक प्रवासी बसून राहिल्यामुळे तिकिट आरक्षीत असलेल्या प्रवाशांना चढता येत नाही. त्यामधूनच माणगाव, खेड स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन पोलिसांनी पावले उचलली होती. त्यामुळे मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दरम्यान, रत्नागिरी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काल सायंकाळी एक चारचाकी मागे येत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर गेली असती. त्यावरुन गाडी चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वादावादी झाली. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी बाहेरील बाजूस बॅरिगेटस् लावून गाड्या आतमध्ये येणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घेतली होती.