एमएमआरडीएच्या कोकणातील अडीच हजार गृहप्रकल्पांची लवकरच सोडत

रत्नागिरी:- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कोकणातील भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत काढण्यात येणार होती. ती काही महिन्यांपासून रखडली आहे. पण या सोडतीला लवकरच मुहूर्त मिळणार आहे.

दोन वर्षापूर्वी करोनाचे संकट आल्यानंतर कोकणातील प्रशासनांनी 2016 च्या सोडतीसह आगामी सोडतीतील 5000 हून अधिक घरे अलगीकरणासाठी घेतली होती. परिणामी 2016 च्या सोडतीतील घरांचा ताबा रखडला आणि सोडतही रखडली. ही घरे लवकरात लवकर परत मिळावीत, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना नोव्हेंबर 2021 मध्ये यश आले. त्यानुसार या घरांचा ताबा मिळाला आहे. मात्र त्यांची दुरवस्था झाली आहे. अखेर ‘एमएमआरडीए’ने नादुरुस्त घरे म्हाडाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. पण  घरांची दुरुस्ती कोण करणार? यावरून वाद निर्माण झाल्याने पुन्हा सोडत रखडली होती.

मात्र यावर तोडगा काढण्यात आला आहे. म्हाडाने दुरुस्तीचे काम करावे आणि ‘एमएमआरडीए’ने यासाठीचा खर्च द्यावा, असा तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार या घरांच्या सोडतीचा मार्गही मोकळा झाला आहे.