मांडवी समुद्र किनाऱ्यावरील स्थानिक रहिवाशांचे व्यवसाय पूर्ववत

किनाऱ्यावरील मनाई आदेश रद्द करण्याचे ना. सामंतांचे प्रशासनास निर्देश

रत्नागिरी: जिल्हा प्रशासनाने गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थी विसर्जन या दोन दिवशी मांडवी समुद्र किनारी हातगाड्या लावणे व इतर व्यवसाय करण्यास मनाई केली होती. प्रशासनाच्या या निर्णयामुळे या परिसरामध्ये गेली अनेक वर्षे छोटे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक सामान्य व्यावसायिकांसमोर अडचण निर्माण झाली होती. आज सकाळी मांडवी समुद्र किनारी भेट देत किनाऱ्यावरील मनाई आदेश रद्द करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी प्रशासनास दिले.

मांडवीच्या स्थानिक नागरिकांनी स्थानिक नगरसेवक बंटी किर यांना भेटून त्यांच्या सहकार्याने ना. सामंताजवळ हा विषय मांडण्याचे ठरवले. त्याप्रमाणे काल  दिनांक, ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथे मांडवीवासीयांनी ना. सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. दिवसभरातील आपले व्यस्त कार्यक्रम आटपून शासकीय विश्रामगृहात आल्यावर त्यांनी मांडवीवासीयांच्या अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढणेसाठी तत्काळ प्रशासनाशी चर्चा केली.

मंत्री सामंत यांनी आज सकाळी ७ वाजता प्रशासनासमवेत स्वतः मांडवी किनाऱ्यास भेट देऊन स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी, ना. सामंतांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत संबधित मनाई आदेश शिथील करण्यास सांगून स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळवून दिला.

मंत्री उदय सामंत यांची काम करण्याची कार्यशैली सर्वांना परिचित आहेच. याचा प्रत्यय मांडवी वासीयांना आला. रात्री उशिरा झालेली भेट व दुसऱ्या दिवशी सकाळी झालेला निर्णय हा सर्व अनुभव मांडवीवासीयांसाठी अत्यंत सुखद व हितावह होता. ना. सामंतांनी अत्यंत जलदगतीने प्रश्नांची सोडवणूक केली असल्यामुळे ते कायम रत्नागिरीकरांसोबतच आहेत हा विश्वास सार्थ करून दाखविला असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत होते.