परदेशी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आता ई-बाजार होणार माध्यम

रत्नागिरी:- कोकणातील फलोत्पादनाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी परवान्याची अडचण दूर करताना आता थेट ई-बाजार माध्यमातून निर्यात करता येणार आहे.  हा ऑनलाईन सुलभ  पर्याय  उपलब्ध करुन देताना उत्पादकांनी सामान्य  सेवा केंद्राच्या (सीएससी) संकेतस्थळावर नोंदणीकरण्याचे आवाहन कृषी विभगाने केले आहे.

या योजनेतून  शेतकरी आपला शेतमाल थेट परदेशात विकू शकणार आहे. तेही  कोणत्याही परवान्याशिवाय . या योजनेद्वारे अधिकाधिक शेतकर्‍यांना आपला शेतमाल हा परदेशात विकण्याची व्यवस्था शासनाने उपलब्ध करुन  दिली आहे. तसेच कृषी उत्पादन विकल्यानंतर या योजनेमुळे शेतकर्‍याला पैशासाठी वाट पाहावी लागणार नाही, तर पैसे  त्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. यासाठी शेतकर्‍यांना सर्वप्रथम सीएससीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

ही नोंदणी करत असताना शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाची माहिती, त्याचे वजन (आकार) तसेचच शेतमाल कोणत्या किंमतीत विकायचा आहे यासारखी महत्त्वाची माहिती द्यावी लागते. त्यासोबतच त्यांना आपण शेतकरी असल्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्यासाठी आणि योजनेच्या अदिक माहितीसाठी कृषी केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.