शिरगाव-उद्यमनगरात कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य

रत्नागिरी:- शहराला लागून असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेल्या चंपक मैदान नजिकच्या भागात सध्या कचर्‍याच्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातून ये-जा करणारे नागरिक तसेच गणपतीपुळेसह मिर्‍या, आरे-वारे समुद्र किनारी जाणार्‍या पर्यटकांना प्रचंड दुर्गंधीतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन नेमके या परिसराकडे कोणत्या कारणाने दुर्लक्ष करीत आहे? असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

शिरगाव ग्रामपंचायत ही रत्नागिरी जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. मागील दीड वर्षापासून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक आहे. तरी या भागातील प्रशासकीय कामे वेळेमध्ये होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र उद्यमनगर येथील चंपक मैदानासमोरील रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप दिसून येत असल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदरच्या भागामध्ये कचरा उचलणारी गाडी येते की नाही? असा प्रश्नही या भागातून ये-जा करणार्‍या पादचारी, पर्यटक वाहनधारकांना पडत आहे. या रस्त्यावरून जाता-येता असे दिसून येते की, औद्योगिक वसाहतीच्या बाहेर निम्म्याहून जास्त रस्ता हा कचर्‍याने भरून गेला असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे प्रमाण काहीअंशी कमी होत असतानाच इतर साथीच्या रोगांनी डोके वर काढले असताना शिरगाव ग्रामपंचायतीचे प्रशासन असे ढिम्मपणे का वागत आहे? अशीही विचारणा ग्रामस्थांमध्ये होत आहे. या भागात श्वसनाचे विकार, मलेरिया, डेंग्युसारखी रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या भागामध्ये ग्रामपंचायत सदस्य नसल्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असे असले तरी आगामी काळात सदर वॉर्डमधून इच्छुक निवडणूक उमेदवार हे नेमके कोणत्या संधीची वाट पहात आहेत. निवडणूक आली की बाशिंग बांधून उभे असलेले उमेदवार नेमके आता कुठे गायब झाले आहेत? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.