रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाची मान्यता : ना. उदय सामंत

५२२ कोटींच्या निधीस मंजुरी

रत्नागिरी:-जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी रत्नागिरी येथे सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास युती सरकारने ५२२ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

ना. सामंत म्हणाले, रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरु करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी” असे करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती श्री.सामंत यांनी दिली.

श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असल्यामुळे येथील जनतेस दर्जेदार व परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत होता. सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेची रूग्णालये आहेत. परंतू, या मर्यादित वैद्यकीय सेवेद्वारे संपूर्ण जिल्ह्यास आरोग्य व्यवस्था पुरविण्यास अडचण निर्माण होत आहे. याचा विचार करून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे.