गणपतीपुळेत दोन हजार भाविकांनी घेतले पदस्पर्श करून दर्शन

रत्नागिरी:- एक गाव एक गणपती ही मागील पाचशेहून अधिक वर्षांची परंपरा गणपतीपुळेत आहे. त्यानुसार कोरोनानंतर दोन वर्षांनी बुधवारी गणेशचतुर्थीला दोन हजार भाविकांनी थेट गाभार्‍यात जाऊन गणपतीपुळेच्या श्रींची पद स्पर्श करुन दर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

गणपतीपुळ्याच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी होत असते. पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. गणपतीचे दर्शन गाभार्‍याच्या बाहेरुन घ्यावे लागते. मात्र वर्षातील एक दिवस भाद्रपद चतुर्थीला गाभार्‍यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करुन दर्शन घेण्याची परंपरा आहे. गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा हा खुला ठेवला जातो. वर्षातून एकदाच श्रींचे पद स्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते. त्या प्रथेनुसार आज पहाटे पुजा आटोपल्यानंतर साडेचार वाजता ग्रामस्थांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मालगुंड, नेवरे, गणपतीपुळे, भंडारपुळे आणि निवेंडी येथील ग्रामस्थांनी दुपारी १२ वाजेपर्यंत श्रींची पदस्पर्शाने दर्शन घेतले. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांनीही गणपतीपुळेमध्ये हजेरी लावली आहे. त्यांनाही याचा लाभ घेता आला. सायंकाळपर्यंत दोन हजाराहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले. कोरोनामुळे मागील दोन वर्षे येथील ग्रामस्थांना पदस्पर्शाने दर्शन घेता आलेले नव्हते. ती प्रथा कायम ठेवता आल्याचे समाधान यंदा ग्रामस्थांमध्ये होते.