गणपतीपुळेत भाद्रपद चतुर्थीला थेट गाभार्‍यात जाऊन पदस्पर्श 

रत्नागिरी:- नवसाला पावणारा गणपती म्हणून जगभर प्रसिध्द असलेला गणपतीपुळ्याचा गणपती प्रसिध्द असून, या गावात गणेशोत्सवाला घरोघरी गणपतीचे आगमन होत नाही. तर भाद्रपद चतुर्थीला थेट गाभार्‍यात जाऊन गावकर्‍यांसह भक्तगणांना गणरायाचे पदस्पर्श करुन आर्शिवाद घेतले जातात. शेकडो वर्ष ही परंपरा आजही येथे जोपासली जात आहे.

गणपतीपुळ्याच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी होत असते. पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्याने गणपतीपुळेचा गणेश जगभर प्रसिध्द आहे. गणपतीचे दर्शन गाभार्‍याच्या बाहेरुन घ्यावे लागते. मात्र वर्षातील एक दिवस भाद्रपद चतुर्थीला गाभार्‍यात जाऊन गणरायाच्या चरणाशी स्पर्श करुन दर्शन घेण्याची परंपरा आहे. गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा हा खुला केला जातो वर्षातून एकदाच श्रींच पद स्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते त्यामुळे इथले गावकरी अगदी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करतात मालगुंड, नेवरे, गणपतीपुळे, भंडारपुळे आणि निवेंडी या ठिकाणचे ग्रामस्थ श्रीं च्या दर्शनासाठी येत असतात.
या दिवशी थेट दर्शन मिळत असल्याने देशाच्या कानाकोप-यातून या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आता हजारो भाविक येऊ लागले आहेत. भक्तांनी या गणपती बाप्पाकडे मनापासून प्रार्थना केल्याने त्यांची मनोकामना पूर्ण होते मिळते. त्यामुळे कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांची या गणपतीवर श्रद्धा आहे. गणेश उत्सव काळात गणपतीपुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे.