भाट्ये येथील अक्षय पिलणकरने साकारली नारळावर श्री गणेशाची मूर्ती

 केंद्रीय कृषीमंत्री यांच्या हस्ते कोची येथे होणार गौरव

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. रत्नागिरीतील भाट्ये येथील तरूण चित्रकार अक्षय  पिलणकरने नारळावर गणपतीपुळ्यातील श्रींची कलाकृती साकारली. ही कलाकृती अक्षयने केरळ-कोची येथील केंद्रीय नारळ विकास मंडळाच्या स्पर्धेत ठेवली. या नारळावर कोरलेली गणपतीपुळे येथील श्री गणेशाची मूर्ती देशात सर्वोत्कृष्ट ठरली. केंद्रीय नारळ बोर्डाने ‘सर्वोत्तम कलाकृती’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार अक्षयला प्रदान केला आहे.

या पुरस्काराचे वितरण 2 सप्टेंबर रोजी म्हणजे जागतिक नारळदिनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोची येथे होणार आहे. योगायोगाने म्हणजे गणेशोत्सवातच गणेशाच्या कलाकृतीच्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

विशेष म्हणजे याचे वडील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार कै.परमानंद पिलणकर यांनाही 2010 साली केंद्रीय नारळ बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता अक्षय याला हा पुरस्कार मिळाल्याने आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला आहे. अक्षयच्या या पुरस्कारामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन झाले आहे. त्याचे मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.