बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका; तक्रारदारांना भरपाई देण्याचे आदेश

रत्नागिरी:- प्लॅट खरेदीसाठी करार केल्यानंतर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे व कामामध्ये प्रगती नसल्याने मुदतीत प्लॅटचा ताबा विल्डरने न दिल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक संग्राम सदानंद पेटकर, महेंद्रकुमार विश्वंभरनाथ तिवारी यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. फ्लॅटधारकांचे ९ टक्के व्याजासह स्वीकारलेली रक्कम, नुकसान भरपाई, तक्रार अर्जाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी ग्राहक राहूल विश्राम जाधव, विलास धाकू जाधव, जनार्दन गणपत तळपे, नितीन बाळकृष्णण जाधव यांनी जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे धाव घेतली. बांधकाम व्यवसायिक संग्राम सदानंद पेटकर, महेंद्रकुमार विश्वंभरनाथ तिवारी हे शहरातील नाचणे, टि.आर. पी. स्टॉप जवळ “एकदंत अपार्टमेंट” ही इमारत विकसीत करत होते.  तक्रारदार यांना प्लॅट खरेदी करावयाचा असल्याने त्यांनी “एकदंत अपार्टमेंट” या प्रकल्पाची बिल्डरची जाहिरात पाहून प्रत्येकी बुकींगची रक्कम देऊन बिल्डरसोबत साठेखताचा करार केला होता. बांधकाम व्यवसायिकाने तक्रारदार यांना डिसेंबर २०१७ पर्यंत प्लॅटचा ताबा देण्याचे मान्य व कबुल करून देखील त्यांना अद्याप पर्यंत बांधकाम व्यवसायिकाने ताबा दिलेला नाही. यासोबत बांधकाम निकृष्ठ दर्जाचे व बांधकामाची स्थिती पाहून तक्रारदार यांनी रत्नागिरी येथील वकील मनिष नलावडे यांच्या मार्फत तक्रार आयोगाकडे दाखल केली होती.

९ टक्के व्याजासह स्वीकारलेली रक्कम, नुकसान भरपाई, तक्रार खर्च देण्याचे आदेश

रत्नागिरीच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये तक्रारदार यांची तक्रार गुणदोषांवर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकुन घेऊन चालविण्यात आली व अंतिम युक्तीवादानंतर तक्रारदार राहून जाधव यांना ९,२५,८००/-, विलास जाधव यांना ९,२१,९३१, नितीन जाधव यांना १०,२४,५८५/-, जनार्दन तळपे यांना १०,२१,२६२/- ची रक्कम १ जानेवारी २०१८ पासून तक्रारदार यांनी बांधकाम व्यवसायिक रक्कम अदा करेपर्यंत ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश करण्यात येऊन मानसिक, शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रार खर्च म्हणून एकुण रक्कम रु. १५,०००/- प्रत्येकी तक्रारदार यांना देण्याचे बांधकाम व्यावसायिकाला आदेश निकालपत्रामध्ये देण्यात आले. न्यायालयीन सुनावणीकामी तक्रारदार यांच्या वतीने प्रतिष्ठीत वकील मनिष चं. नलावडे, अँड. तनया तुषार सावंत, अँड. अफसाना खान यांनी कामकाज पाहिले.