बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी; बाजारपेठा देखील सजल्या 

रत्नागिरी:- आरतीसाठी ढोलकीची तयारी… मिरवणुकीसाठी ढोल-ताशे… बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या बाजारपेठा… आणि गणरायांच्या भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले रस्ते… अगदी सजावटीवरही शेवटचा हात गणेशभक्त फिरवू लागले आहेत… मूर्तीकारही मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात दंग झाले आहेत… बुधवारी कोकणवासीयांचे लाडके दैवत गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना होणार आहे. अनेक गणेशभक्त एक दिवस आधीच बाप्पाला घरी घेऊन जात असल्याने मूर्तीशाळांमधील बाप्पा गणेशभक्तांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. बुधरी जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. 

गणेशोत्सव अवघा दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. चाकरमानी घराघरात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे उत्साहाला अधिकच भरते आले आहे. घरामधील सजावट अधिक आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत आहे. अगदी इकोफे्रंडली गणेशोत्सव होण्यासाठीही ग्रामीण भागापासून शहरातील घरांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट तयार केले जात आहेत. थर्माकॉलच्या मखरांवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी नैसर्गिक सजावटींवर भर दिला आहे. 

घरामध्ये आरतीसाठी ढोलकी हवी म्हणून, ढोलकीची चामडी पाती बदलण्यापासून, नवीन ढोलकी आणण्यापर्यंत गणेशभक्त धावपळ करीत आहेत. गणरायाच्या आगमन मिरवणुकीसाठी ढोल ताशेही सज्ज करण्यात आले आहेत. अनेक ग्रामस्थांनी एक दिवस आधीच गणपती घरी आणण्यासाठी तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये दीड लाखाहून अधिक घरांमध्ये गणरायांचे आगमन होणार आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सवाचीही धामधूम रंगणार आहे.

घरगुती गणेशाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात जवळपास सव्वाशे ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा व जयगडचा राजा या मंडळांची आरास मोठी आहे. पाऊणशे वर्षांची परंपरा असणाºया टिळकआळी गणेशोत्सव मंडळांसारखी सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळांनीही आगमनाची तयारी पूर्ण केली आहे.