जिल्हा शिवसेनेत पुन्हा चलबिचल; राहुल पंडित यांना पदावरून हटवले 

रत्नागिरी:- शिवसेनेच्या रत्नागिरी दक्षिण समन्वयक पदावर संजय पूनस्कर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुखपत्रातून करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र श्री. पूनसकर यांना नुकतेच प्राप्त झाले असून राहुल पंडित यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर त्यांना पदावरुन हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेनेतील काही समर्थक एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे वळू लागले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातही तशी परिस्थिती हळूहळू निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्री उदय सामंत यांच्याशी काही शिवसैनिक गाठीभेटी घेत आहेत. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय राहूल पंडित यांचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वी राहूल पंडित यांनी भेट घेतली होती. मात्र ती भेट खाजगी कारणास्तव घेतल्याचा खुलासाही श्री. पंडित यांनी केला होता. पुढे त्यांच्या या भेटीगाठी वाढल्याही होत्या. मागील काही दिवसात शिंदेच्या समर्थकांविरोधात ठाकरे सेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. पंडित यांनी सामंतांची भेट घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ते शिंदे समर्थक मंत्री सामंत यांच्या गोटात जाणार का याबाबत तर्कवितर्क लढविले गेले. रविवारी (ता. २८) शिवसेनेच्या मुख पत्रातून संजय पूनस्कर यांची रत्नागिरी दक्षिण समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर झाले. ही नियुक्ती राहूल पंडित यांच्या जागी केली गेली. त्यामुळे भविष्यात सामंतांच्या भेटीला जाणार्‍यांना हा एकप्रकारे इशारा ठरला आहे. या नियुक्तीनंतर श्री. पंडित यांनी संयमी प्रतिक्रिया व्यक्त करत आतापर्यंत कोणत्याही पदासाठी काम केले नसल्याचे सांगितले. पदावरुन हटवल्यामुळे पंडित यांचा पुढील मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, नवनियुक्त श्री. पूनसकर हे समविचार मंचच्या माध्यमातून सामाजिक प्रश्‍नांवर आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेत आश्‍चर्य व्यक्त केले जात असून या नियुक्त्यांबाबत स्थानिक पदाधिकार्‍यांना कोणतीच कल्पना नसल्याचे पुढे आले आहे.