गणपतीपुळेत भाद्रपदी गणेशोत्सव सोहळा; भाविकांची मोठी गर्दी 

कोरोनानंतरचे वर्ष; दिवसभरात चार हजार भक्तांनी घेतले दर्शन

रत्नागिरी:- मागील दोन वर्षे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवावर कोरोनाच्या सावट होते. निर्बंधच नव्हे तर कोरोनाचा प्रादुर्भाव बहूतांश कमी झाल्यामुळे यंदा भक्तगणांमध्ये उत्साह होता. रविवारपासून (ता. २८) भाद्रपदी गणेशोत्सवाला गणपतीपुळेत प्रारंभ झाला असून १ सप्टेंबर २०२२ रोजी भाद्रपदी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. दिवसभरात चार हजारहून अधिक भक्तगणांनी दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी श्रींची महापूजा झाली. सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पुजा, आरती, मंत्री पठण आदी कार्यक्रम झाले. दुपारी प्रसाद वितरण करण्यात आले. गणेशोत्सवासाठी पहिल्या दिवशी विविध प्रकारची फुलांची रांगोळी काढून गाभार्‍यात सजावट करण्यात आली होती. शनिवार, रविवारी जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेकजणं गणपतीपुळेत दर्शनासाठी दाखल झाले होते. सकाळी महापुजेला गणपतीपुळे मंदिराचे ट्रस्टी, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. १ सप्टेंबरपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येणार असून दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या कालावधीत आरती आणि ७.३० ते ९.३० या वेळेत ह.भ.प विलास गरवारे ( कुरोली सिद्धेश्वर जि. सातारा) यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार (ता. २९) सकाळी ११ ते १२ यावेळेत सहस्र मोदक समर्पण आणि बुधवारी (ता. ३१) दुपारी ४ ते ६ यावेळेत श्रींची पालखी मिरवणूक होणार आहे. दुपारी ११.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जाणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे फक्त पुजार्‍यांच्या उपस्थितीत विधीवत पुजा करण्यात आली होती. त्यामुळे भक्तांना दर्शनासाठीही येता आलेले नव्हते. सध्या निर्बंध नसल्यामुळे भक्तगण उत्साहाने दर्शनासाठी गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. यावर्षी गणेशोत्सवासाठी गावी येणार्‍यांची संख्या अधिक असल्यामुळे गणपतीपुळेतही पर्यटकांचा राबता वाढण्याची शक्यता आहे.