प्रवासी बंदूक, बॉम्ब घेऊन रेल्वेत चढल्याचा आला फोन अन् उडाली एकच धावपळ 

रत्नागिरी:- सावंतवाडी रेल्वेस्थानकावर एक पांढरे कपडे घातलेली व्यक्ती हातात बंदूक व बाॅम्ब घेऊन वास्को द पाटणा या रेल्वे गाडीत चढल्याची फाेन सिंधुदुर्गातील कंट्रोल रुमच्या ‘डायल ११२’ वर आला आणि पाेलिसांची धावपळ उडाली.                       

 पाेलिसांचा ताफा घटनास्थळावर पाेहाेचेपर्यंत गाडीने स्टेशन साेडले. त्यानंतर रत्नागिरी पाेलिसांना माहिती देण्यात आली. बुधवारी मध्यरात्री १२.४५ वाजता पाेलीस रत्नागिरी रेल्वे स्थानकात पाेहाेचले. मात्र, काहीच हाती लागले नसून हा फाेन एका वेडसर व्यक्तीने केल्याचे समाेर आले.

वास्काे द पाटणा गाडी शस्त्रधारी व्यक्ती चढल्याचे कळताच सावंतवाडी पाेलिसांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. मात्र, सावंतवाडीतून ही गाडी सुटल्याने रत्नागिरी पाेलिसांना माहिती देण्यात आली. रत्नागिरीतील ११ पाेलीस अधिकारी, ४८ अंमलदार, रेल्वे पोलीस अधिकारी ३ व ८ अंमलदार आणि बाॅम्ब शोधनाशक पथकाची टीम मध्यरात्री रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पाेहाेचली. गाडी रेल्वे स्थानकात येताच संपूर्ण रेल्वेची कसून तपासण्यात करण्यात आली. तब्बल ३८ मिनिटे ही रेल्वे तपासल्यानंतर काहीच हाती लागले नाही. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांनी दिलेल्या वर्णनाची व्यक्तीही पोलिसांना दिसली नाही. त्यामुळे पाेलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

त्यानंतर पोलिसांनी त्या काॅलची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी फाेन करणारी व्यक्ती वेडसर असल्याचे सांगितले.

पाेलीस अलर्ट

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या कंट्रोल रुमला असाच एक काॅल आल्याने मुंबई पोलीस ‘अलर्ट’ झाली होती. बुधवारी मध्यरात्री सिंधुदुर्ग पोलिसांना डायल ११२ यावर काॅल आल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. त्यांच्यासह रत्नागिरीचे पाेलीसही अलर्ट झाले हाेते.