पानवल धरणाची लवकरच दुरुस्ती; धरणाचे होणार दगडी बांधकाम

लवकरच फेर सर्वेक्षण; 12 कोटी निधीची आवश्यकता

रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरूस्तीचा विषय़ कालच्या अधिवेशनात तारांकीत झाला. कोविडमुळे रखडलेला ८ कोटी ७४ लाखाचा दुरूस्तीचा प्रस्ताव आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी नाशिकच्या मेरी या संस्थेकडुन फेर सर्व्हे करून पानवल धरणाची दगडी बांधकामामध्ये दुरूस्ती केली जाणार आहे. गाळ काढुन त्याची साठवण क्षमता वाढविण्यासह, मजबुतीकर, सांडव्याचे काम केले जाणार आहे. पाच वर्षांचा कालावधी गेल्याने दुरूस्तीचा प्रस्ताव आता १२ कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे.

पालिका प्रशासनाने ही अधिकृत माहिती दिली.  
रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराणे (ग्रॅव्हिटीने) पाणीपुरवठा करणारे पानवल धरण अखेरची घटका मोजत आहे. १९६५ ला उभारण्यात आलेले या धरणाच्या मजबुतीकरणासाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे धरणाला प्रचंड गळती असून साठवण क्षमताही कमी झाली आहे. या धरणाच्या दुरूस्तीसाठी ५ वर्षांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला होता. काँक्रीटची भिंत उभारून धरणाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव होता. काँक्रीट भिंत उभारावी की अन्य प्रकारे दुरूस्ती करावी, यासाठी नाशिकची ‘मेरी’ या संस्थेकडून धरण दुरूस्तीसाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर या धरणदुरूस्ती व मजबुतीकरणासाठी सुमारे ८ कोटी ८४ लाखाची आवश्यकता होती. मात्र कोविडमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता.

आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न अधिवेशनात तारांकीत केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने मंत्री शंभुराजे देसाई यांना त्यांनी यावर सभागृहाला उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराणे पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धऱणाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आला होता. मात्र कोविडच्या काळात निधीची कमतरती असल्याने हा प्रस्ताव मागे पडला होता. मात्र आता नाशिकच्या मेरी या संस्थेकडुन पानवळ धरणाची सर्व्हे करून या धऱणाची दगडी बांधकामात दुरूस्ती केली जाणार आहे. दर्जा भरून गळती कमी केली जाईल. सांडव्याचे काम करायचे आहे तसेच गाळ काढुन साठवण क्षमताही वाढवायची आहे. लवकच या प्रक्रियेला गती मिळेल, असे उत्तर देण्यात आले. तसेच याबाबत आयुक्त, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, पालिका मुख्याधिकारी यांनाही या कामाबाब वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पानवल धरणाचे लवकरच मजबुतीकण होणार आहे.