मंडणगडमध्ये जलस्वराज्य योजनेत 25 लाख 59 हजारांचा अपहार

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पडवे येथील गावाकरीता असलेल्या जलस्वराज्य अंतर्गत नळपाणी योजनेत 25 लाख 59 हजारांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील भिकाजी म्हामुणकर आणि श्रीमती राजश्री प्रभाकर म्हामुणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विष्णू प्रल्हाद पवार (42, भिंगळोली, मंडणगड) यांनी पोलीस स्थानकात दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007-08 या सालामध्ये जलस्वराज्य योजनेंतर्गत नळपाणी योजनेमध्ये सुशील म्हामुणकर आणि राजश्री म्हामुणकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वेळोवेळी धनादेशाद्वारे रक्कमा काढल्या. यामध्ये थोडी थोडकी नव्हे तर 25 लाख 59 हजार 30 रुपयांची रक्कम काढून अपहार केला असा अहवाल गटविकास अधिकारी मंडणगड यांनी 2 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर उपआयुक्त कोकण विभाग मुंबई यांनी चौकशीमध्ये अपहार झाल्याचे नमूद केले. सुशील व राजश्री म्हामुणकर यांनी कोणत्याही कायदेशीर नियमांचे पालन न करता स्वतःच्या फायद्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शाखा अभियंता लघुपाटबंधारे विभाग मंडणगड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांना दिले. आदेश प्राप्त होताच लघुपाट बंधारे शाखा विभागाचे विष्णू पवार यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दोघांविरोधात जनतेची व शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली.