टीईटी परीक्षेत घोळ घालणाऱ्या जिल्ह्यातील 37 जणांवर होणार कारवाई 

रत्नागिरी:- राज्यात सध्या शिक्षकांच्या संपादणूक चाचणीसाठी घेतल्या जाणार्‍या टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या परीक्षेतील घोटाळेबाज गुरूजींची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 7874 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यात 225 टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 37 जण अपात्र असल्याचे समोर आले आहे. आता या 37 जणांवर कारवाई होणार हे निश्चित आहे.  

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही राज्यात फेब्रुवारी 2013 पासून सरू करण्यात आली. मागील नऊ वर्षांमध्ये झालेल्या परीक्षेत बोगस प्रमाणपत्र घेणार्‍यांची टोळी उघड झाली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसह अनेक शिक्षणाधिकार्‍यांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी परीक्षा परिषदेच्या संचालकांनाही याविषयी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 2013 पासून आतापर्यंत या परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, याची यादी परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केली आहे. परीक्षा परिषदेने ही यादी प्राथमिकच्या शिक्षण संचालकांना दिली आहे. शिक्षण संचालकांनी ही यादी प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्‍यांना दिली आहे. त्यात्या जिल्ह्यांतील शिक्षणाधिकार्‍यांनी ही यादी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली आहे.

मुख्याध्यापकांना ही यादी देऊन या यादीमध्ये तुमच्या शाळेतील कोण शिक्षक यामध्ये आहेत का, हे शोधण्यास सांगितले आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील शिक्षकांची शोधमोहीम सुरू झाली आहे.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शोधमोहीम राबविणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. या मोहिमेतून यामध्ये गुंतलेले शिक्षक सापडणार का, हा कुतुहलाचा विषय आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रश्न अति कठीण असल्यामुळे या परीक्षेचा निकाल खूपच कमी म्हणजे 4 ते 5 टक्के एवढाच लागत होता. ही परीक्षा कठीण असल्यामुळे उत्तीर्णांचे प्रमाण अतिशय नगण्य होते.

त्यातच शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असल्याचा फतवा शासनाने फेब्रुवारी 2013 ला काढला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच नोकरीवर घेण्याचा कायदा सरकारने केला होता. त्यामुळे येनकेन प्रकारे ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा चंग गुरूजी होण्यार्‍यांनी बांधला होता. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी त्यांनी दर्शविल्यामुळे हा घोटाळा घडला आहे.
सन 2013, 2014 मध्ये डिराज्यात टीईटी परीक्षा घोटाळ्यातील जाहीर करण्यात आलेली शिक्षकांची संपूर्ण यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हास्तरावर 2019 मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 225 डी.एड्. धारकांचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सादर करण्यात आले आहेत. त्या प्रमाणपत्रांची छाननी शिक्षण विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. रत्नागिरी 2019 मध्ये घेण्यात आलेली ही परिक्षा 6-7 केंद्रावर घेण्यात आलेली होती. टीईटी उमेदवारांच्या बोगस प्रमाणपत्रांची छाननीत रत्नागिरीत आतापर्यंत 37 शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले असून जिल्ह्यााचे केवळ 5 टक्के प्रमाण आहे.