गावागावात पुरवलेले सौरदिवे बंद अवस्थेत; कोट्यावधींचा खर्च पाण्यात 

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेचीही बचत व्हावी म्हणून  शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना सौरदिव्यांचा लाभ देण्यात आला होता. मात्र आजमितीस या पैकी 80 टक्के सौरदिवे बंद स्थितीत असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे योजनेंंतर्गत करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला.

ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सुविधा उपलब्ध करून विजेचीही बचत व्हावी म्हणून शासनाने सौर पथदीपांची योजना आखली होती. या योजनेंंतर्गत गावांमध्ये सौरदिवे लावण्यात आले. मात्र काही कालावधीतच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे सौरऊर्जेचे दिवे बंद पडले, आता फक्त शोभेच्या वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. या योजनेसाठी शासनाने खर्च केलेले  पैसे वाया गेले आहेत.

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना या योजनेतून सौरदिव्यांचा लाभ देण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावखेड्यातील सार्वजनिक जागा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावातील चौकात असे जिल्हाभरात 20 हजारांहून अधिक सौरदिवे लावण्यात आले होते. मात्र स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे या सौरदिव्यांच्या बॅटर्‍या चोरीस जाणे, खांब तुटून पडणे, सौर प्लेट खराब होणे अशा अनेक कारणांमुळे आजमितीस 80 टक्के सौरदिवे गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद पडले आहेत. लहानात लहान असलेल्या एका सौरदिव्याच्या संचासाठी 20 हजार 500 रुपये खर्च येतो. तर चार दिव्यांच्या मोठ्या संचासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. काही सौरदिव्यांच्या बॅटर्‍या चोरीस गेलेल्या आहेत, तर काही नादुरुस्त झाल्या आहेत. पावसाळ्यात अनेक खांब गंजून गेले आहेत, अनेक ठिकाणी सौरदिव्याची वाताहत झाली आहे. सौरवीज निर्माण करणार्‍या काचेच्या प्लेट (उपकरण) तुटून पडलेले दिसून येत आहेत.