सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाचपैकी केवळ एकमेव कासव संपर्कात 

रत्नागिरी:- ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाच पैकी वनश्री हे एकमेव कासव संपर्कात आहे. काही दिवसांपुर्वी संपर्क तुटलेले रेवा हे चौथे कासव ठरले. मागील सहा महिन्यातील निरीक्षणांवरुन या कासवांचे कायम वास्तव्य हे अरबी समुद्रातील असावे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच ती अति खोल समुद्रात प्रवास करत जात नसावीत यालाही पुष्टी मिळाल्याचे अभ्यासक सांगत आहे.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कोठून येतात. याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग केलेली पाच कासवे समुद्रात सोडण्यात आली. त्यातील लक्ष्मी, प्रथमा, रेवा, सावनी या चार कासवांचा विशिष्ठ अंतर प्रवास केल्यानंतर संपर्क तुटला. तर वनश्री एकमेव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपर्कात होती. ते मालवण किनार्‍यापासून काही अंतरावर समुद्रात डुबकी घेत होते. ६ ऑगस्टला वनश्रीकडून सिग्नल मिळणे बंद झाले. ट्रान्समीटर निकामी झाल्यामुळे किंवा बॅटरी संपल्यामुळे संपर्क तुटल्याचा अंदाज अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे. वनश्री कासव १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गुहागर येथून टॅग लावून सोडण्यात आले. कासव गोव्याच्या किनार्‍यापासून १००  किलोमीटर अंतरावर कॉन्टिनेंटल शेल्फच्या काठावर होती. पाच पैकी वनश्री कासवाचा प्रवास  कोकण आणि गोवा किनारपट्टीच्या दरम्यान होता. त्या पलिकडे कुठेच वनश्रीचा प्रवास झालेला नाही. दरम्यान, प्रथमा कासव गुजरातला जाऊन माघारी परतले. यावरुन ती अतिखोल समुद्रात जात नसून खंडीय भागातच राहत असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे. पावसाळ्यानंतर पुढील प्रवासाच्या नोंदी घेण्यासाठी वनश्री संपर्कात राहणे आवश्यक होते; मात्र या अभ्यासासाठी सर्वांनाच प्रतिक्षा करावी लागणार आहे.