दापोलीत दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने गोविंदाचा मृत्यू

दापोली:- जिल्ह्यातील दापोलीतील पाज पंढरी गावात एका गोविंदाचा दहीहंडीच्या सणादरम्यान निधन झालं आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचत असताना या गोविंदाला अचानक हृदयविकराचा झटका आला. हा झटका इतका भयानक होता की कुणाला समजण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली.       

  रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्याउत्साहात साजरा केला जातो. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यामध्ये ५२ वर्षीय वसंत चौगुले सहभागी झाले होते. ते गोविंदा खेळण्याचा आनंद घेत होते. त्यांनी दहीहंडी उत्सवात फेर धरून थोडा वेळ आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली, ते जमिनीवर कोसळले. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित बातमी वाऱ्यासारखी पसरतात पंचक्रोशीतील गोविंदावर दुःखाचे सावट पसरले.