१८ ऑगस्टचा योगायोग; गणेशगुळे किनारी देखील आढळली होती ओमानची मासेमारी नौका

रत्नागिरी:- रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे शस्त्र साठ्यासह एक नौका आढळली आहे परंतु दोन वर्षांपूर्वी दि. १८ ऑगस्ट २०२० रोजी रत्नागिरीतील पावस नजिकच्या गणेशगुळे येथे ओमान मधीलच मासेमारी नौका किनाऱ्यावर आली होती. इंजिन व्यतिरिक्त त्यामध्ये काहीही संशयास्पद वस्तू त्यावेळी आढळल्या नव्हत्या परंतु  नौका मालकाचा शोध लागल्यामुळे पोलिसांनी ती नौका नष्ट केली आहे परंतु योगायोगाने 18 ऑगस्ट रोजी या दोन्ही नौका आढळल्यामुळे या नौकेची चर्चा सुरू झाली आहे.

 या बोटीवर सुमारे दोन लाखांची अद्ययावत इंजिन, मशिन्स होती. वादळी वारा, जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे बोट उलटली असण्याची शक्यता त्यावेळी वर्तविण्यात आली होती.  गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर बेवारसपणे मच्छीमार बोट पाण्यात तरंगत असल्याचे दिसल्यानंतर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी किनाऱ्यावरून ती बोट ताब्यात घेतली होती.
 गेले काही दिवस वादळी वारा, जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे बोट उलटली असण्याची शक्यता आहे. गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर बेवारसपणे मच्छीमार बोट पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. ही बोट ग्रामस्थांना दिसल्यानंतर याबाबत पोलीस पाटील संतोष लाड यांनी पाहणी केली. पाण्यातील बोटीला रस्सी बांधून किनार्‍यावर आणली. त्यानंतर श्री. लाड यांनी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना तातडीने कळवले. त्यानंतर श्री. गावीत यांनी गणेशगुळे समुद्रकिनार्‍यावर धाव घेतली.

 पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने त्यावेळी मत्स्य विभागाला माहिती देण्यात आली आणि मत्स्य विभागाने ही बोट ओमान येथील असून वादळी पावसात बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आणली.