रानभाज्या महोत्सवातून बचतगटांना आर्थिक आधार

रत्नागिरी:- कृषि विभाग, आत्मा, बाजार समिती आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विदयमाने रत्नागिरीत झालेल्या रानभाज्या महोत्सवामध्ये तिस प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्या विक्रीमधून बचत गटांना सुमारे १५ हजार रुपये मिळाले.

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन . पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती सुनंदा कु-हाडे, डॉ. किरण माळशे, डॉ. वैभव शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, सहाय्यक सरव्यवस्थापक मिलींद जोशी, यु. डी. चिखले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी रानभाज्यांचे महत्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज यावर डॉ. माळशे आणि रानभाज्यांचे आहारातील महत्व याबाबत डॉ. आशुतोष गुजर यांनी मार्गदर्शन केले.

या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या ३० रानभाज्या व औषधी वनस्पतींचे नमुने व त्यांचे गुणधर्म याबाबत माहिती देण्यात आली. त्या प्रदर्शनात भारंगी, दिंडा, कुरडू, केना, कुडाच्या शेंगा, आघाडा, टाकळा, आंबाडी, पानाचा ओवा, कपाळफोडी, लाजाळू, अळू, हळदीची पाने, शेवगा, पिंपळ, बांबू, सुरण, करटोली, मटारू, माठ, चिवळ, घोळभाजी, भुई आवळा, कवठ, केळफूल , गवती चहा इत्यादी रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. बचत गटातील महिलांनी या भाज्या विक्रीसाठीही ठेवलेल्या होत्या. गोळप येथील महात्मा बळीराजा शेतकरी गटाने ६ हजार ५०० रुपयांच्या भाज्यांची विक्री केली. यामध्ये सर्वाधिक विक्री करटोली या भाजीची झाली. दोनशेहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवाबाबत श्रीमती चिखले म्हणाल्या की, शहरातील नागरीकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे मानवी आरोग्यास असणारे फायदे व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावेत, नव्या पिढीस रानभाज्यांच्या पाककृती माहीत व्हाव्यात व रानभाज्यांच्या विक्रीतून शेतक-यांना आर्थिक लाभ व्हावा हा या महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे.