मांडवी बंदरात गाळ साचल्याने मच्छिमारांना समुद्रात जाण्याचा मार्ग बंद होण्याची भीती 

रत्नागिरी:- भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने मच्छिमारांचा समुद्रात ये-जा करण्याचा मार्गच बंद होणार आहे. याला शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी खाडी परिसरातील राजिवडा, भाट्ये, फणसोप आणि कर्ला गावातील मच्छिमारांची संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भाट्ये खाडी परिसरातील राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या गावात मच्छिमार लोक राहत असून त्यांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. त्यांच्या उदरनिर्वाह हा मासेमारी व्यवसायावरच चालतो. भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग येथील मच्छिमारांना समुद्रात जाण्यासाठी आहे. भाट्ये पुलापासून ते मांडवी बंदरापर्यंतचा भाग दिवसेंदिवस गाळाने भरत चालला आहे. त्यामुळे अनेकदा येथील मच्छिमारांना समुद्राला भरतीची प्रतिक्षा करावी लागते. त्याचबरोबर मांडवी बंदरातील मोठमोठ्या समुद्रातील खडपांमुळेही मच्छिमारांना जाण्यासाठी अडथळा होतो. समुद्रात जाण्याचा हा एकमेव मार्ग धोकादायक बनला आहे. गाळ उपसा व मोठमोठ्या खडपांची समस्या कायमची मार्गी लागण्यासाठी राजिवडा गावातील जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटीने खाडी परिसरातील राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप येथील मच्छिमार संस्थांचे पदाधिकारी, मच्छिमार यांची सभा राजिवडा येथील फिशरीज शाळेत आयोजित केली होती. मागील २५ वर्षापासूनचा हा प्रश्‍न शासन दरबारी मांडण्यावर मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. पुर्वी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी लेखी निवेदनेही दिली होती. या गंभीर समस्येबाबत वेळावेळी मच्छिमारांकडून पाठपुरावाही करण्यात आलेला होता. तरीही शासनाने ही समस्या गांभिर्याने न घेता कायमच दुर्लक्ष केले. त्याबद्दल या सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ही समस्या मार्गी लावण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मच्छिमारांनी लढा उभारण्यासाठी मच्छिमारांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. लवकरच पुन्हा एकदा ही समस्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहे. यावेळी मच्छीमारांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, महंमद सईद फणसापेकर, शफी वस्ता, दरबार वाडकर, नदीम सोलकर, खालिद सोलकर, अरमान भाटकर, मुनीर मुकादम, जहुर बुड्ये, अब्दुल लतीफ बुड्ये, नुरमहंमद सुवर्णदुर्गकर, इम्रान सोलकर , रहिम दलाल, नौशाद वाडकर, नजीर फणसापेकर, गालिब मुल्ला, बच्चू काद्री व अन्य मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.