गुहागरातील ७५ मच्छीमार नौकांची तिरंगा रॅली

रत्नागिरी:- हलका वारा, अधूनमधून पडणार्‍या जोरदार सरी यांची परवा न करता गुहागर तालुक्यातील पडवे, नवानगरसह आजूबाजूच्या परिसरातील ७५ मच्छीमारांनी नौकांमधून हर घर तिरंगा मोहीम यशस्वीतेसाठी समुद्रामध्ये पडवे ते जयगड अशी रॅली काढली. प्रत्येक नौकेवर तिरंगा फडकवण्यात आला होता. देशभक्तीपर गितेही प्रत्येक नौकेवर लावण्यात आली होती. त्यामुळे मच्छीमारही भारावून गेले होते.

आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी दुचाकी, चारचाकी रॅलींसह पदयात्रा काढल्या जात आहे. हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, देशप्रेम याला अनुसरुन रत्नागिरीतील मच्छीमारांची समुद्रामध्ये नौकांद्वारे रॅली काढण्याचा निर्णय मत्स्य विभागाकडून घेण्यात आला होता. त्याला गुहागर तालुक्यातील मच्छीमारांनी प्रतिसाद दिला. 75 नौका सायंकाळी पडवे येथून एका रांगेत जयगडच्या दिशेने रवाना झाल्या. एका पाठोपाठ एक अशा नौकांचा ताफा समुद्रामधून पुढे सरकत होता. देशभक्ती जागृत करणारी गाणी प्रत्येक नौकेवर लावण्यात आली होती. पाऊस आणि वार्‍यामुळे वातावरणही बिघडलेले आहे. पाण्यालाही थोडा करंट होता. याही परिस्थितीमध्ये मच्छीमारांनी पडवे ते जयगड आणि तेथून पुन्हा पडवे बंदरात अशी फेरी मारली. सुमारे दीड तासाच्या या उपक्रमामुळे मच्छीमारी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरा होते. पडवे येथे शनिवारी (ता. १२) दुपारी रॅलीला आरंभ झाला. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय एन. व्ही. भादुले मार्गदर्शनाखाली प्रत्येक नौकेवर तिरंगा लावण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमाला श्री. भादुले यांच्यासह गुहागर पोलीस निरीक्षक श्री. पाचपुते, परवाना आधिकरी श्री. देसाई, उत्कर्षा किर, पडवे सरपंच व आदर्श मच्छीमार संस्थेचे चेअरमन मुजीब जांभारकर, मुदसर खळे, मकबूल जांभारकर, मुस्तर खळे, नजीर जांभारकर, सागर सुरक्षा रक्षक स्वप्नील झिंगे, साईनाथ साळवी यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.