दोन दिवसांत तब्बल 989 शिक्षक जिल्ह्याबाहेर बदलीसाठी उत्सुक 

बदलीपात्र शिक्षकांची यादी 16 ऑगस्टला प्रसिद्ध होणार 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. बदल्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवली होती. या कालावधीत ९८९ जणांनी परजिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. बदली पात्र शिक्षकांची यादी तीन दिवसांनी म्हणजेच १६ ऑगस्टला बाहेर पडणार आहे.

आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षक दरवर्षी प्रयत्न करत असतात. आतापर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यामुळे पाच वर्षानंतर ते आपल्या गावाकडे परतात. रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला स्थगिती ेदेण्यात आली होती; मात्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी पोर्टल खुले करण्यात आले. ९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सव्वातिनशे शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज सादर केले. त्यानंतर बदली प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली. या कालावधीत बदलीसाठी परजिल्ह्यात जाणार्‍या शिक्षकांची संख्या वाढली असून सहाशेहून अधिक शिक्षकांनी वाढीव मुदतीत अर्ज सादर केले. आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात जाणार्‍या शिक्षकांची संख्या ९८९ वर पोचली. बदलेल्या वेळापत्रकानुसार पात्र ठरणार्‍या शिक्षकांची यादी १६ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. १३ ऑगस्टला ही यादी जाहीर केली जाणार होती. तिन दिवस मुदत पुढे ढकलण्यात आली आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या १७ टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बदलीसाठी पात्र ठरणार्‍या शिक्षकांना परवानगी देणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सध्या अनेक शाळांवर बदलीने शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडण्यात आले तर रिक्त पदांची संख्या आणखी वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळा असून त्यात सव्वा सहा हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. ९०४ पदे रिक्त असून आंतरजिल्हा बदलीमुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.